Soyabin big update ; चिन घेईना अमेरिका सोयाबीन, आयात शून्यावर.
चीनने सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही आयात केला नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर प्रथमच चीनने अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली आहे. मागील वर्षी या काळात १.७ दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केले होते.
अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. त्याउलट ब्राझीलहून चीनची सोयाबीन आयात ३० टक्के वाढून १०.९६ दशलक्ष टनांवर गेली, तर अर्जेटिनाहून ९१ टक्के वाढून १.१७दशलक्ष टनांवर गेली.
सप्टेंबरमध्ये चीनची एकूण सोयाबीन आयात १२.८७ दशलक्ष टनांवर पोहोचली. हा आतापर्यंतचा दुसरा सर्वांत मोठा आकडा आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेसोबत व्यापार करार झाला नाही तर पुढील वर्षी चीनला फेब्रुवारी-एप्रिलदरम्यान सोयाबीनची टंचाई जाणवू शकते. चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयात करणारा देश आहे.




















