Rain update October ; उद्या या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अहमदनगर (अहिल्यानगर) आणि अकोला पर्यंतच्या भागातून माघार घेतल्यानंतर, मॉन्सूनच्या परतीचा प्रवास तात्पुरता थांबला होता. त्यानंतर हवामान शास्त्र विभागाने गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कानकेर, कियोनजरगड, सागरबेठ, गुवाहाटी या भागांत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील मॉन्सूनची माघार.
मॉन्सूनने संपूर्ण गोवा, झारखंड, पश्चिम बंगाल व सिक्कीम आणि बिहारमधील उर्वरित भागातून माघार घेतली आहे. तसेच, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातूनही मॉन्सून परतला आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा आणि ईशान्येकडील राज्यांतून मॉन्सून लवकरच माघार घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान.
मॉन्सून माघार घेत असतानाच, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, आसाम आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. या स्थितीमुळे वातावरणात आर्द्रता वाढून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत येत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक असे हवामान तयार झाले आहे आणि मंगळवारपासून विविध भागांत पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.




















