कर्जमाफीसाठी सरकारचे बैठकीचे निमंत्रण, पण बच्चू कडूंची निर्णायक भूमिका: ‘बंद खोलीत चर्चा नको, निर्णय शेतकऱ्यांसमोर घ्या!’
शेतकरी एकवट: नागपुरात भव्य आंदोलन; सरसकट कर्जमाफीची मुख्य मागणी
गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘शेतकरी एकवट’ या आंदोलनाची मोठी लाट उभी राहिली आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन, ‘शेतकरी हीच एक जात’ मानत त्यांनी कापूस, धान, सोयाबीन उत्पादक, तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातील शेतकरी बांधवांना एका छताखाली आणले आहे. यात मच्छिमार आणि मेंढपाळ बांधव देखील सामील आहेत.
शेतकऱ्यांचा हा मोठा एल्गार २८ ऑक्टोबर पासून नागपुरातील जामठा मैदान (क्रिकेट स्टेडियमजवळ, परसोडी, वर्धा रोड) येथे धडकणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाल्याशिवाय माघार नाही, ही बच्चू कडू यांची आंदोलनाची मुख्य आणि अंतिम मागणी आहे.
सरकारचे निमंत्रण फेटाळले; ‘तोंडी आश्वासने नकोत’
नागपूरच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सरकारमध्ये मोठी धांदल उडाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीसाठी निमंत्रण दिले आणि त्यात कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मात्र, बच्चू कडू यांनी हे निमंत्रण स्पष्टपणे नाकारले. पूर्वी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे, आता केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास नाही, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. सरकारच्या या हालचाली केवळ आंदोलन दडपण्यासाठी किंवा त्याला दिशा देण्यासाठी आहेत, असे त्यांचे मत आहे.




















