बंगालच्या उपसागरात चक्रिवादळ बनण्याची शक्यता, महाराष्ट्राला धोका किती?
राज्यात २७ ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज असून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन सागरी प्रणालींच्या एकत्रित प्रभावावर हवामान तज्ज्ञांचे बारीक लक्ष आहे.
बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली सक्रिय:
अरबी समुद्रातील ‘डिप्रेशन’ प्रणालीमुळे राज्यात सध्या पावसाळी स्थिती आहेच, त्यातच आता बंगालच्या उपसागरातही एका नवीन व तीव्र हवामान प्रणालीचा विकास सुरू झाला आहे. आज, २४ ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांजवळ बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रिवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत उत्सुकता आहे.
संभाव्य मार्ग आणि तीव्रता:
सुरुवातीला, हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. समुद्रातील पोषक स्थितीमुळे त्याची तीव्रता वेगाने वाढेल आणि ते टप्प्याटप्प्याने ‘तीव्र कमी दाब क्षेत्र’ (Well Marked Low), ‘डिप्रेशन’ (Depression) आणि ‘डीप डिप्रेशन’ (Deep Depression) मध्ये विकसित होईल. जर समुद्रातील स्थिती अनुकूल राहिली, तर त्याचे चक्रिवादळातही रूपांतर होऊ शकते. सर्व हवामान मॉडेल्सनी या प्रणालीच्या निर्मितीला दुजोरा दिला असून, तिची पुढील दिशा आणि तीव्रतेचा अंदाज घेतला जात आहे.
















