ई-पीक पाहणीचा स्टेटस ऑनलाइन असे तपासा ; तुमची नोंद सातबाराला झाली का?
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची सातबाराला नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी करण्याची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’च्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. या पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन किती आहे आणि त्यांनी कोणती पिके घेतली आहेत, ही सर्व माहिती आता एकत्रित केली जाते.
ई-पीक पाहणीचे महत्त्व
या ‘ग्री-स्टॅक’ प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई, विविध सरकारी योजनांचे लाभ किंवा इतर सर्व सरकारी बाबी आता पार पाडल्या जातात. म्हणूनच, खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली ई-पीक पाहणी आपल्या सातबाराला नोंदवली गेली आहे का, हे तपासणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
स्टेटस तपासण्याची सोपी प्रक्रिया
पीक पाहणीची नोंद सातबाराला येण्यासाठी किती क्षेत्राची पीक पाहणी झाली आहे आणि कोणत्या पिकासाठी झाली आहे, हे तपासण्यासाठी आपल्याला ‘आपली चावडी’ पोर्टलवरती जावे लागते. या पोर्टलवरती आल्यानंतर एका नवीन टॅबमध्ये ई-पीक पाहणीची माहिती जोडण्यात आलेली आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्ही कॅप्चा कोड टाकून आपला गट नंबर किंवा खाते नंबर टाकून ई-पीक पाहणी झाली आहे की नाही, हे तपासू शकता.
















