अतिवृष्टी नुकसान भरपाई: हेक्टरी ₹८,५०० की ₹१८,५००? शेतकऱ्यांमधील संभ्रम निर्माण.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सध्या नुकसान भरपाईच्या रकमेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. माध्यमांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१८,५०० मदतीची घोषणा केली जात असताना, शासनाचे अधिकृत शासन निर्णय (जीआर) मात्र केवळ ₹८,५०० प्रति हेक्टर मदतीचा उल्लेख करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
₹८,५०० मदतीचे कारण: एनडीआरएफचे निकष
शेतकऱ्यांना दिली जाणारी ₹८,५०० प्रति हेक्टर ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) च्या निकषानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. या निकषानुसार, जिरायती किंवा खरीप पिकांसाठी ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. सध्या अनेक जिल्ह्यांसाठी निधी वितरणाचे जे जीआर आलेले आहेत, ते याच एनडीआरएफ निकषांवर आधारित आहेत. त्यामुळे, त्यामध्ये केवळ ₹८,५०० चा उल्लेख दिसत आहे आणि त्यानुसारच काही ठिकाणी पैसे जमा होत आहेत.
वाढीव मदत आणि ₹१८,५०० चा हिशोब
एनडीआरएफच्या मदतीव्यतिरिक्त, राज्य शासनाने रब्बी हंगामासाठी ₹१०,००० रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. एनडीआरएफचे ₹८,५०० आणि राज्य सरकारची वाढीव मदत ₹१०,००० मिळून एकूण ₹१८,५०० होतात. मात्र, एनडीआरएफची मदत आणि ही वाढीव मदत दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे.
मर्यादेत वाढ: दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की, एनडीआरएफच्या दोन हेक्टरच्या मर्यादेव्यतिरिक्त, एका हेक्टरचा वाढीव निधी राज्याच्या विशेष निधीतून दिला जाईल. यामुळे एकूण नुकसान भरपाईची रक्कम वाढते. या वाढीव निधीसाठीचा शासन निर्णय लवकरच येणे अपेक्षित आहे.