अखेर हेक्टरी 10,000 रब्बी अनुदान मंजूर, असे होणार वाटप पहा सविस्तर.
शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी बातमी आहे, कारण अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १०,००० रुपयांचे रबी अनुदान अखेर मंजूर झाले आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुदानाच्या वाटपासाठी ११,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे अनुदान लवकरच वितरित होणार असून, एकूण अनुदानाची रक्कम (मागील मदतीसह) आता १९,००० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.
यापूर्वी, राज्य शासनाने खरीप २०२५ मधील नुकसानीसाठी ३२,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. यापैकी आतापर्यंत फक्त ८,४०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती आणि हेक्टरी ८,५०० रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान वितरित करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुबार गट नंबर, वारसांची माहिती नसणे अशा अनेक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत झाली नव्हती. यामुळे, ८०% शेतकऱ्यांची माहिती अपलोड होऊनही, केवळ ४० लाख शेतकऱ्यांना (साधारणपणे ४२०० कोटी रुपये) नुकसान भरपाईचे वितरण झाले आहे.
आता मंजूर झालेले रबी अनुदान पुढील १५ दिवसांमध्ये वाटप केले जाणार आहे. हे वाटप दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात, ज्या शेतकऱ्यांची ‘अॅग्रेस्टॅक फार्मर आयडी’ नोंदणी झाली आहे आणि ते मंजूर (अप्रूव्ह) आहेत, त्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट अनुदानाचे वितरण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात, ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांचे फार्मर आयडी अपूर्ण आहेत, त्यांना ई-केवायसी (e-KYC) च्या आधारे अनुदानाचे वाटप केले जाईल.




















